पाकिस्तानसाठी रवी वर्माने केली खतरनाक हेरगिरी | पाकिस्तानी एजंटला पाठवली महत्त्वपूर्ण माहिती.
डॉकसह नेव्हलच्या 14 पाणबुड्या अन् जहाजांची पुरवली माहिती

पाकिस्तानी एजंटांना माहिती पुरवणाऱ्या कळव्यातील रवी वर्मा याने दोन पाकिस्तानी महिला एजंट यांच्या फेसबुकवर भारतीय नौदल आणि डॉकयार्डमधील तब्बल १४ पाणबुड्या आणि जहाजांची माहिती पायल शर्मा आणि इस्प्रीत यांच्या फेसबुक अकाऊंटवर पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
घरात कमवता रवी वर्मा हाच आहे. दरम्यान, रवी हा टीबी या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती त्याच्या आईने दिली. माझा मुलगा निर्दोष असून पाकिस्तानी एजंटांचा दबाव आणि धमकावल्याने त्याने हे कृत्य केले असावे, असे तिने सांगितले.
पाकिस्तानी एजंटांनी डिफेन्स संबंधित विभागात काम करणाऱ्या रवी वर्मा याला हेरले आणि फेसबुकच्या माध्यमातून संपर्क करत गोड बोलून त्याला जाळ्यात अडकवले. रवी वर्मा मूळचा उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे राहणारा आहे. रवी वर्मा याची आई काही महिन्यांपूर्वीच ठाण्यात आली. रवी वर्मा हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नेव्हल डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल फिटर इंजिनीयर असून तो हनी ट्रॅपचा शिकार झाल्याचे उघड झाले आहे. रवी वर्मा हा नोव्हेंबर २०२४ पासून पाकिस्तानी फेसबुक अकाऊंटच्या संपर्कात होता.
वर्माने लढवली युक्ती :
वर्माकडे जहाजांची माहिती मागण्याचा ससेमिरा सुरू असतानाच पाणबुड्यांबाबतही माहितीचा ससेमिरा होता, तेव्हा त्याने युक्ती लढवत पाणबुड्या आणि जहाजांची माहिती डोक्यात संकलित करत तिचे वर्णन शब्दात आणि संगणकावर प्रतिरूप चित्रफीत तयार करून दोन्ही महिला एजंटच्या फेसबुकवर टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
रवी वर्माच्या या युक्तीमुळे भारतीय सुरक्षेची गोपनीय माहिती ही पाकिस्तान एजंटच्या हाताला लागली. संगणकावर प्रतिकृती चित्रफीत बनवून त्याने १४ पाणबुड्या आणि जहाजांची माहिती पुरवण्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन महिलांच्या फेसबुकवर टाकली माहिती ;
रवी वर्मा याचे पाकिस्तानी एजंट पायल शर्मा आणि इस्प्रीत यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्या बनावट फेसबुक आयडीच्या ललनांनी रवी वर्मा याला भुरळ पाडली. त्याच्याकडून एका प्रोजेक्टसाठी जहाजांची माहिती मागितली. या एजंट दररोज रवी वर्मा याच्याशी संपर्क करून प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात भेटू, असे आमिष दाखवत असत.
ऑनलाइन सेक्सद्वारे भुरळ ;
पाकिस्तानी एजंट या रवी वर्मासोबत नग्न होऊन ऑनलाइन सेक्स करून त्याला भुरळ पाडीत होत्या, तर त्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याला त्याच्या खात्यावर पैसे टाकल्याच्या नोंदीही आढळल्याने रवी वर्माने पाक महिला एजंटांना नौदलाच्या १४ पाणबुड्या युद्धनौका आणि जहाजांची इत्थंभूत माहिती पुरवली.






