पुण्यात भरधाव कारने टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना उडविले | चौघांचे पाय मोडले
पुण्यात पुन्हा 'ड्रंक अँड ड्राइव्ह'चा थरार; विश्रामबाग पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

पुण्यात पोर्शे कार प्रकरणानंतर पुन्हा एकदा शहराच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेत भरधाव कारचा थरार पाहायला मिळाला. शनिवारी (दि. ३१) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास भावे हायस्कूलजवळील चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आलेल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडविले.
या घटनेत १२ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना संचेती आणि मोडक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात कारचालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू होती. जयराम शिवाजी मुळे (वय २७) असे आरोपी चालकाचे नाव असून गाडी मालक दिगंबर शिंदे आणि सहप्रवासी राहुल गोसावी असे ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. तर, अविनाश फाळके, प्रथमेश पतंगे, संदीप खोपडे, सोनाली घोळवे,मंगेश सुरवसे, अमित गांधी, समीर भालचिकर, सोमनाथ मेरूकट, प्रशांत बंडगर, किशोर भापकर, पायल दुर्गे, गुलणाज अहमद अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
यातील तिघांना संचेती रुग्णालयात तर नऊ जणांना मोडक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सदाशिव पेठ पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण असून, येथे स्पर्धा परीक्षांचे अनेक क्लास आहेत. येथे राज्यभरातून विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येतात. शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास भावे हायस्कूलजवळील चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी काही विद्यार्थी गेले होते. याच वेळी एका कारने भरधाव वेगाने चहाच्या टपरीकडे येत चहा पित असलेल्या विद्यार्थ्यांना उडविले. या भीषण अपघातात १२ विद्यार्थी जखमी झाले. या अपघातानंतर कारचालक तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना स्थानिकांनी त्याला पकडले.
* चौघांचे पाय मोडले…
चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्षात येण्याअगोदर भरधाव कारने मुलांना उडविले. या वेळी १२ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. पोलीस प्रशासन आणि स्थानिकांनी तत्काळ जखमींना दोन खासगी रुग्णालयांत दाखल केले. या घटनेमध्ये चार विद्याथ्यांचे पाय मोडल्याचे समोर आले, तर इतर विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.






