डिजिटल अरेस्ट’ करून सेवानिवृत्त शिक्षिकेला ८३ लाखांचा गंडा घातला | अंबाजोगाई येथील घटना
मनी लाँड्रिंग, अतिरेक्यांना फंडिंग झाल्याची सायबर भामट्यांकडून थाप, विश्वास नांगरे पाटलांचेही वापरले नाव

तुमच्या नावाने मनी लॉड्रिंग आणि अतिरेक्यांना फंडिंग झाल्याची माहिती आहे. मी महाराष्ट्र पोलीस बोलत असून आम्हाला सहकार्य करा’ असे म्हणत व्हॉट्सॲपला व्हिडीओ कॉल करून एका सेवानिवृत्त शिक्षिकेला सायबर भामट्यांनी डिजिटल अरेस्ट केली. त्यानंतर २१ ते २९ मे दरम्यान तब्बल ८३ लाख रुपये ऑनलाइन लंपास केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित निवृत्त शिक्षिकेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली, त्यानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील एका निवृत्त शिक्षिकेच्या बाबतीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. २० मे रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. ‘मी महाराष्ट्र पोलीस संजय पिसे बोलतो’ असे त्याने सांगितले. नंतर हिंदी भाषेत तो म्हणाला की, तुमच्या आधारकार्ड वरून दुसरे सीमकार्ड १६ एप्रिल रोजी घेतले गेले आहे. या सीमकार्डच्या माध्यमातून तुमच्या नावाने मनी लाँड्रिंग व अतिरेक्यांना फंडिंग झाली आहे. तुम्ही तीन दिवसांत सर्व सहकार्य करा, आम्ही तुम्हाला यातून सोडवू. यासाठी आम्ही विश्वास नांगरे पाटील साहेब यांना स्पेशली विनंती केल्याचा विश्वासही दिला.
आरोपींनी व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलद्वारे मुंबई पोलिसांचे ऑफिस, झेंडे, लोगो दाखवून खोटे वातावरण निर्माण केले. ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये असल्याचे सांगून, भीती दाखवत शिक्षिकेकडून आर्थिक व्यवहार करवून घेतले. हे सर्व खरे असे समजून सेवानिवृत्त शिक्षिकेने २१ मे रोजी पहिल्यांदा एकाचवेळी ३५ लाख १० हजार रुपये ऑनलाइन त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात पाठविले. त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी त्यांनी २९ मेपर्यंत एकूण ८३ लाख १ हजार ८१६ रुपये सायबर ठगांना पाठविले.
यादरम्यान संबंधित शिक्षिकेला सातत्याने फोन व व्हिडीओ कॉल करत त्यांच्यावर दडपण आणले जात होते. ३० मे रोजी गुन्हेगारांनी व्हॉट्सॲप वरून त्यांना ब्लॉक केले आणि फोन बंद केला. त्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यानंतर त्यांनी बीड सायबर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यावरून शनिवारी (दि.३१) गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस करत असून एकाचवेळी इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याने खळबळ उडाली असूने सायबर पोलिसांसमोर आता या गुन्ह्याच्या तपासाचे आव्हान असणार आहे.
आम्हाला तुमची सर्व संपत्ती दिसते ! सायबर भामट्यांनी दाखविली भीती
सायबर भामट्यांनी सेवानिवृत्तशिक्षिकेला भीतीदाखवततुमच्याकडे कोणती संपत्ती आहे, हे आम्हाला येथे दिसते. तुम्ही लपवून ठेवू नका, असे सांगत भीती दाखवण्यात आली. यामुळे सेवानिवृत्त शिक्षिकेने त्यांच्याकडील सोने, प्लॉट गहाण ठेवून त्यावर कर्ज घेतले आणि २९ मे रोजी हे सर्व पैसे भामट्यांना ऑनलाइन पाठविले.





