पुण्यातील एका व्यक्तीला 15 कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने तिघांनी 23 लाख रुपयांना गंडा घातला
पुण्यातील एका व्यक्तीला 15 कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने तिघांनी 23 लाख रुपयांना गंडा घातला

इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करणाऱ्या पुण्यातील एका व्यक्तीला 15 कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने तिघांनी 23 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.
याप्रकरणी तुषार कृष्णराव गावंडे (रा. कोथरूड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रद्युम्न विरसिंग शिंदे (39, रा. हातकणंगले, कोल्हापूर), महेश श्रीकर गरुड (57, रा. कराड, सातारा), बिन्नू शहा (45) या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गावंडे यांना व्यवसायासाठी 15 कोटी रुपयांची गरज होती. त्यांची एका परिचितामार्फत आरोपींसोबत ओळख झाली होती. त्या वेळी तिघांनी संगनमत करून एका फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळवून देतो, असे प्रलोभन दाखविले. आरोपी शिंदे याने तो एका फायनान्स कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे फिर्यादींचा त्यांच्यावर विश्वास बसला.
आरोपींनी वेळोवेळी गावंडे यांच्याकडून कर्ज मंजूर करण्यासाठी 23 लाख 27 हजार रुपये घेतले. तसेच, कर्ज मंजूर झाल्याची बनावट पत्रेदेखील दाखवली. प्रत्यक्षात त्यांना पैसे मिळाले नाहीत.






