हुंड्यासाठी सासरी छळ; विवाहितेची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
हुंड्यासाठी सासरी छळ; विवाहितेची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

माहेरहून पाच लाख रुपये व सोन्याचे दागिने आणावे म्हणून सासरच्या नातेवाइकांनी छळ केल्याने विवाहितेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार नगर रस्त्यावरील केसनंद परिसरात घडला. स्वाती सूरज पाठक (20) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती सूरज राजेंद्रप्रसाद पाठक (26) याला अटक करण्यात आली. याप्रकरणी सासू सुनीता पाठक (45), दीर नीरज पाठक (23), मामे सासरे अरुण उपाध्याय, अरविंद उपाध्याय (सर्व रा. केसनंद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत स्वातीच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वाती मूळची मध्य प्रदेशातील महू शहरातील आहेत. तिचा गेल्या वर्षी मार्च महिन्यात सूरज पाठक याच्याशी विवाह झाला होता. विवाहात स्वातीच्या कुटुंबीयांनी एक लाख रुपये हुंडा आणि सात तोळे सोन्याचे दागिने दिले होते. विवाहानंतर काही महिन्यांत पती सूरज, सासू सुनीता, दीर नीरज, मामे सासरे उपाध्याय यांनी हुंड्यात पैसे, तसेच दागिने कमी दिल्याचे सांगून तिचा छळ सुरू केला. माहेरहून पाच लाख रुपये हुंडा आणि सोन्याचे दागिने घेऊन येण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे स्वातीने शुक्रवारी आत्महत्या केली.




