
बांधकाम मजुरीचे आमच्या वाट्याला आलेले १ हजार रुपये आत्ताच दे म्हणत सख्या भावानेच सख्या भावाच्या गळ्यावर व पाठीवर चाकूने सपासप वार करत हत्या केल्याची घटना कन्नड तालुक्यातील दिगाव येथे मंगळवारी (दि.१०) रात्री ९. ३० वाजेच्या सुमारास घडली. सुनील भीमराव आव्हाड (रा. दिगाव खेडी) असे मृताचे नाव आहे.
सदरील माहिती अशी की,पिशोर पोलीस ठाणे हद्दीतील दिगाव (ता. कन्नड) येथील आव्हाड कुटुंबातील तिघे भाऊ आपल्या आईवडिलांसोबत एकत्र कुटुंबात राहतात. ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मागील काही दिवसांपूर्वी त्यांचे आई वडील मूतखड्याच्या ऑपरेशन निमित्त मुंबई येथे गेलेले होते. तर तिघा भावांना खेडी येथील बांधकाम मजुरीचे १००० रुपये मिळाले होते. दिगाव येथील राहत्या घरी रात्रीचे जेवण करत असताना त्या तीन भावांत मजुरीच्या पैशावरून वाद झाला. तिघे भाऊ यानी मिळून केलेल्या बांधकाम मजुरीचे १००० रुपये मधील आमच्या वाट्याचे पैसे आम्हाला आत्ताच दे असे म्हणत त्यांच्यात भांडण विकोपाला गेले. यात विनोद आव्हाड याचा राग अनावर होऊन त्याने रागाच्या भरात चाकूने भाऊ सुनील आव्हाड याच्या गळ्यावर व पाठीवर सपासप वार केले. या हल्ल्यात सुनील रक्तबंबाळ अवस्थेत जागीच कोसळला. याप्रकरणी प्रकाश भीमराव आव्हाड (रा. दिगाव) यांच्या फिर्यादीहून पिशोर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.११) आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील अधिकचा तपास सपोनि शिवाजी नागवे करीत आहेत



