News

प्राचार्याच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

मुलगा छत्रपती संभाजीनगरचा पनवेलमधील घटना

पनवेलमधील पोयंजे येथील सारा नर्सिंग कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या उदय मोतीलाल आगळे (१९) या छत्रपती संभाजी नगरच्या विद्यार्थ्याने ३ जून रोजी प्राचार्याच्या छळाला कंटाळून कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पनवेल तालुका पोलिसांनी या विद्यार्थ्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सारा नर्सिंग कॉलेजमधील महिला प्राचार्या निशा श्रीजीत नायर हिच्याविरोधात ॲट्रोसिटी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

उदय मोतीलाल आगळे (१९) असे या विद्यार्थ्यांचे नाव असून, तो छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होता. उदयला सीईटी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्याचा कुठेही नंबर लागला नव्हता. याच कालावधीत पनवेलच्या पोयंजे भागातील सारा नर्सिंग कॉलेजने उदयला संपर्क साधून त्याला बीएससी नर्सिंगच्या प्रथम वर्षात प्रवेश घेण्यास सुचवले होते. तसेच तो राखीव वर्गातील असल्याने त्याला हॉस्टेल, मेस, कॉलेजचे कपडे या सर्व सुविधा मोफत मिळतील, असे कॉलेजकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे उदय याने या नर्सिंग कॉलेजमध्ये डिसेंबर २०२४ मध्ये प्रवेश घेतला. मात्र, प्रत्यक्षात त्याला कॉलेजकडून काहीच सुविधा मिळाल्या नाहीत. उलट कॉलेजकडून त्याच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती.

याबाबत उदयने जाब विचारला असता, कॉलेजच्या प्राचार्या निशा नायर यांनी उदयला सर्वांसमोर जातीवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक आणि अवहेलना करण्यास सुरुवात केली.याबाबतची माहिती उदय आपल्या आई-वडिलांना नेहमी देत होता. तसेच या कॉलेजमध्ये त्याला शिक्षण घ्यायचे नाही, असे तो वारंवार आपल्या आई-वडिलांना सांगत होता. मात्र, आई-वडील त्याची समजूत काढून फक्त शिक्षणावर लक्ष देण्याबाबत सांगत होते. तर दुसरीकडे निशा नायर ही त्याला नेहमी घालून पाडून बोलत त्याला अपमानित करत होती.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी घटनेची सखोल माहिती घेतली असता, उदयला कॉलेजच्या प्रा. निशा नायर वारंवार मानसिक त्रास देत असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी निशा नायर हिच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.प्रा. निशा नायर हिच्याकडून होत असलेला छळ असह्य झाल्याने उदयने गत ३ जून रोजी मेध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आपल्या आईला संपर्क साधून सर्वांची विचारपूस केली. त्यानंतर त्याने प्राचार्याच्या छळाला कंटाळल्यामुळे जीवन संपवत असल्याचे सांगून फोन कट केला. दरम्यान, उदयची आई त्याच्या मोबाईलवर संपर्क साधत होती, मात्र तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे तिने उदयचा मित्र नरसिंह गिरी याला संपर्क साधून उदयच्या रूममध्ये जाऊन पाहणी करण्यास सांगितले. त्यावर तो उदयच्या रूमवर गेला असता, त्याला उदय गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या वेळी उदयला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button