प्रेयसीच्या 10 वर्षीय मुलीवर नराधमाचा अत्याचार | मुंबईत विकृतीचा कळस

जोगेश्वरी-पूर्व येथे एका नराधमाने त्याच्या प्रेयसीच्या १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून नाजूक भागात टोकदार स्क्रूड्रायव्हर टाकला. त्याचा व्हिडीओसुद्धा त्याने बनवल्याने जनमानसात संतापाची लाट उसळली आहे.याप्रकरणी पोलिसांनी २४ वर्षीय आरोपी तरुणाला अटक केली आहे.त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पीडित मुलीची आई आरोपीसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होती, असे समजते. तक्रारदार महिला कॅटरिंग व्यावसायिकाकडे काम करते. तिचा तिच्या पतीशी वाद आहे, ज्यामुळे ती पतीपासून वेगळी राहते. तिच्यासोबत काम करणाऱ्या तरुणासोबतच ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. ही महिला घरी नसताना आरोपी तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायचा. मेघवाडी परिसरातील या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर आरोपी तरुणासह त्याच्या प्रेयसीलाही मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गंभीर गुन्हे नोंदवले आहेत.
राज्यभरात महिलांवरील अत्याचार, लैंगिक छळाच्या धक्कादायक घटना समोर येत असताना, त्यात या भयंकर प्रकाराची भर पडली आहे. पीडित मुलीची आई कामावर निघून जाताच त्या मुलीवर आरोपी लैंगिक अत्याचार करायचा. पीडित मुलीच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकत त्याने या संपूर्ण कृत्याचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर पुन्हा मुलीवर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार मुलीच्या आईला कळल्यानंतर आरोपीने तिच्यावरही तीक्ष्ण वस्तूने हल्ला केला. जर कोणाला या प्रकाराची माहिती दिली तर काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी नराधमाने दिली होती. याप्रकरणी आरोपी तरुण आणि त्याच्यासोबत राहणाऱ्या महिलेला अटक करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे