दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाने चांगले होणार असेल तर चांगलेच – शरद पवार

अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोमिलनाच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. याबाबत शरद पवार यांना विचारता दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन चांगले काम केले, तर कधीही चांगलेच आहे. सगळे मतभेद विसरून चांगले काम केले तर वाईट वाटायचे कारण नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रश्नांवर भाष्य केल्याने पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी टाकलेल्या गुगलीने काका-पुतण्यांचे नेमके चाललेय तरी काय, या प्रश्नाबरोबरच राज्याच्या राजकारणात ते दोघेही पुन्हा एकत्र दिसणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये सक्तीच्या हिंदीकरणाविरोधात एल्गार सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक, राजकीय नेत्यांपासून अगदी राजकीय पक्षांपर्यंत हिंदीविरोधात दंड थोपटले आहेत. या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट करताना पवार म्हणाले की, पहिली ते चौथी हिंदीसक्तीची गरज नाही. पाचवीपासून हिंदी येणे आवश्यक आहे; मात्र हिंदीला विरोध करताना तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण भारतात ५० टक्के नागरिक हिंदीत बोलतात. त्याचबरोबर जनसुरक्षा कायद्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. या कायद्यात दुरुस्ती करण्याच्या विचार सुरू असून, याला आमचा पाठिंबा असल्याचेही पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरेंच्या भूमिकेवर बोलताना ते म्हणाले, दोन्ही ठाकरेंची भूमिका मी वाचली असून, मुंबईला गेल्यानंतर याबाबत भेटीगाठी करणार आहे. राज ठाकरे यांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार यांनी सांगितले, त्यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे म्हटले आहे; मात्र तुम्ही सहभागी व्हा म्हटल्यावर सहभागी होता येत नाही. भूमिका समजावून घ्यावी लागेल. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय असेल तर भूमिका घेतली जाईल, असेही शरद पवार यांनी नमूद केले