हिंदी भाषा सर्व भारतीय भाषांची मैत्रीण आहे – अमित शाह

हिंदी भाषा कोणत्याही भारतीय भाषेची विरोधक नाही, तर ही भाषा सर्व भारतीय भाषांची मैत्रीण आहे. तसेच देशात कोणत्याही विदेशी भाषेला विरोध झाला नाही पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
त्याचबरोबर सर्व राज्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकीचे शिक्षण स्थानिक भाषेत देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन अमित शाह यांनी केले.
केंद्र सरकारच्या अधिकृत भाषा विभागाच्या सुवर्ण जयंती सोहळ्याला संबोधित करताना अमित शाह यांनी हिंदी बरोबर स्थानिक भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच गत काही दशकांमध्ये देशात फूट पाडण्यासाठी भाषेचा वापर करण्याचे अपयशी प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी लावला. मुळात प्रशासकीय कामकाजात भारतीय भाषांचा उपयोग झाला पाहिजे. यासाठी केंद्र सरकार सर्व राज्यांना मदत करेल, असे अमित शाह म्हणाले.
माझा पूर्ण विश्वास आहे की, हिंदी कोणत्याही भारतीय भाषेची विरोधक असू शकत नाही. हिंदी सर्व भारतीय भाषांची मैत्रीण आहे. हिंदी आणि अन्य भारतीय भाषा मिळून देशाच्या संस्कृतीचा स्वाभिमान वाढू शकतात, असे अमित शाह म्हणाले. त्याचबरोबर गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी आपल्या भाषेचा वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जोपर्यंत एखादी व्यक्ती आपल्या भाषेचा स्वाभिमान बाळगत नाही, आपल्या भाषेत बोलत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडू शकत नाही, असा दावा अमित शाह यांनी केला.
कोणत्याही विदेशी भाषेला विरोध झाला नाही पाहिजे; परंतु आपल्या भाषेचा गौरव वाढवणे, आपल्या भाषेत बोलणे आणि आपल्याच भाषेत विचार करण्यासाठी आपण आग्रही असले पाहिजे, असे शाह म्हणाले. जर देशाचा विषय असेल तर भाषा फक्त संवादाचे माध्यम नाही, तर ती देशाची आत्मा आहे. भारतीय भाषांना जिवंत ठेवणे आणि त्यांना समृद्ध बनवणे महत्त्वपूर्ण आहे.आगामी काळात सर्व भारतीय भाषा, विशेषकरून अधिकृत भाषेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आवश्यकता शाह यांनी व्यक्त केली. देशाला एकजूट करण्यासाठी आपल्या भाषा शक्तिशाली माध्यम बनल्या पाहिजेत, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले. आजघडीला जेईई, नीट, सीयूईटीसारख्या परीक्षा १३ भाषांमध्ये घेतल्या जात आहेत. अगोदर फक्त इंग्रजी आणि हिंदीत या परीक्षा देता येत होत्या; परंतु आपल्या सरकारने हे बदल घडवून आणले आहेत. आजघडीला ९५ टक्के उमेदवार हे आपल्या मातृभाषेतून परीक्षा देत असल्याचे सांगताना मला आनंद होत असल्याचे शाह म्हणाले.