पोलीस शिपायाने 12 वर्षे घरी बसून घेतला पगार

मध्य प्रदेशातील एक व्यक्ती शिपाई म्हणून पोलीस खात्यात भरती झाल्यानंतर एकही दिवस कामावर गेला नाही. परंतु गेली १२ वर्षे त्याचा पगार मात्र नियमित त्याच्या खात्यात पडत होता. कवडीचेही काम न करता या व्यक्तीने सुमारे २८ लाख रुपये पगार घेतला आहे. आता प्रकरण समोर आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.अभिषेक उपाध्याय असे या व्यक्तीचे नाव आहे.
अभिषेक २०१२ मध्ये पोलीस भरतीद्वारे निवडला गेला होता. भोपाळमध्ये त्याची नियुक्ती करण्यात आली आणि तेथून प्रशिक्षणासाठी त्याला सागर येथील पोलीस अकादमीत पाठवण्यात आले. परंतु अभिषेक प्रशिक्षणासाठी गेलाच नाही. त्याऐवजी तो विदिशा येथील त्याच्या घरी निघून गेला. प्रशिक्षणाला अनुपस्थित राहण्यासाठी अभिषेकने कोणताही अर्ज दिला नव्हता. त्याऐवजी त्याने आपली सर्व्हिस फाईल स्पीड पोस्टद्वारे भोपाळ कार्यालयाकडे पाठवली. मात्र पोलीस प्रशासनातील संबंधित विभागाने हे गांभीर्याने घेतले नाही. अशा प्रकारे तब्बल १२ वर्षे तो नोकरीवर असल्याचे गृहीत धरून त्याला दरमहा वेतन दिले जात होते.
एसीपी अंकिता खतेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पदोन्नती, वेतनवाढ करण्यासाठी अभिषेकचे सर्व्हिस बुक तपासले असता त्याच्या नावासमोर कोणताही शेरा नव्हता. गत १२ वर्षांत एखादा पुरस्कार मिळाल्याची किंवा एखादी शिक्षा झाल्याची कोणतीही नोंद सर्व्हिस बुकवर नसल्याने संशय बळावला. यानंतर अभिषेकला पोलीस मुख्यालयात बोलावून घेण्यात आले आणि या सर्व प्रकरणाचा खुलासा झाला. अभिषेकने गत १२ वर्षांत एक दिवसदेखील नोकरी केली नाही. परंतु त्याला नियमित वेतन मिळत होते. याबाबत त्यानेही सोयीस्कर मौन बाळगले. आता तो त्याची चूक झाल्याचे मान्य करत आहे. आपण १ लाख रुपये जमा केले असून उर्वरित पैसेदेखील हळूहळू परत करेन, असे अभिषेकने सांगितले. त्याने आपण मानसिकरीत्या आजारी असल्याचा दावा केला आहे. पोलीस प्रशासन आता त्याच्या दाव्याची पडताळणी करत आहे. एक व्यक्ती इतके वर्षे कामावर येत नसल्याचे कोणाच्याच लक्षात कसे आले नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. यासाठी कार्यालयीन कर्मचारी, अधिकाऱ्यांपैकी कोण जबाबदार आहेत, याची चौकशी करण्यात येत आहे.





