उच्चशिक्षित तरुणांनी घातला सव्वादोन कोटींचा गंडा! चेन्नईच्या अधिकाऱ्याला केले डिजिटल अरेस्ट

चेन्नईतील एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला दिल्ली सायबर पोलीस असल्याची बतावणी करून 2 कोटी 25 लाख 24 हजार 900 रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसीतील दोन तरुणांना अटक करण्यात आली. 10 ते 17 ऑगस्ट 2024 दरम्यान त्यांनी हा गुन्हा केला होता. यातील तब्बल 1.36 कोटी रुपये या तरुणांच्या बँक खात्यात आल्याचे चेन्नई सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न होताच त्यांना संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने 31 जुलै रोजी देवळाई चौकाजवळील ग्रैंड मोदी हॉटेलमधील खोली क्र. 208 मध्ये पकडले.
श्रीकांत सुरेशराव गाडेकर (34, रा. वडगाव कोल्हाटी) आणि नरेश कल्याणराव शिंदे (26, रा. आर्यन सिटी, तिसगाव चौफुली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत, असे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले. सायबर भामटे हे नेहमी परराज्यातील असतील, असे सर्वसामान्यांना वाटते. मात्र, आपल्या शहरात एवढ्या मोठ्या फसवणुकीतील आरोपी पकडल्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच घटना आहे.तामिळनाडूतील तांबरम शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात सायबर क्राईम विंगचे पोलीस निरीक्षक बी. के. शशीकुमार संभाजीनगरात आले. त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांची भेट घेऊन प्रकरण सांगितले. डॉ. राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मदत करण्याचे आदेश दिले. तामिळनाडू पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक पवन इंगळे, अमलदार श्रीमंत भालेराव, अशोक वाघ, शिवानंद बनगे यांच्या पथकाने दोन दिवस तांत्रिक विश्लेषण करून आरोपींना शोधले.
तामिळनाडूचा गुन्हा, तपासात आरोपी निष्पन्न
फिर्यादी प्रभाकरन कुंथू चंद्रन (रा. तामिळनाडू) हे निवृत्त सरकारी अधिकारी असून खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांना भामट्याने फोन करून दिल्ली सायबर क्राईम ब्रँचमधून अमित शर्मा बोलत असल्याचे सांगून नरेश गोयल मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रभाकरन यांच्या कॅनरा बँकेच्या खात्यातून 2 कोटींची मनी लाँड्रिंग झाल्याचे सांगितले. त्यांना अटकेची भीती दाखविली. अटक वॉरंट व्हॉट्सअपवर पाठविले.त्यानंतर व्हॉट्सअप कॉल केला. तो कॉल सुमारे 2 तास 42 मिनिटे सुरू होता. तेथे एकजण पोलीस गणवेशात दिसत होता. त्याने अवघ्या 1 मिनिटापेक्षाही कमी वेळासाठी चेहरा दाखविला आणि नंतर कॅमेऱ्याच्या फोकसपासून दूर गेला. ती जागा पोलीस ठाण्यासारखी वाटत होती. तेथे वॉकी टॉकीचाही आवाज येत होता.त्यादरम्यान भामट्यांनी प्रभाकरन यांच्या वडिलांच्या नावासह त्यांची आर्थिक मालमत्तेची संपूर्ण माहिती घेतली. दर तासाला लोकेशनबाबत अपडेट घेतली जात होती. 10 ते 17 ऑगस्ट 2024 दरम्यान आरोपींनी सव्वादोन कोटी रुपये उकळल्यानंतर प्रभाकरन यांना संशय आला आणि हे प्रकरण पोलिसांकडे गेले होते.
सतत बदलायचे हॉटेल
श्रीकांत आणि नरेश हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. एकाचे बी.टेक तर दुसऱ्याचे इंजिनीअरिंग झालेले आहे. कंपनीत नोकरीला जातो, असे सांगून ते सतत घराबाहेर राहायचे. नेहमी हॉटेलमध्ये मुक्काम करायचे. दोन ते तीन दिवसाला हॉटेल बदलायचे. मागील काही दिवसांमध्ये त्यांच्या खात्यावर सुमारे साडेचार कोटीचे व्यवहार झाल्याची माहिती आहे. हॉटेलमधून पोलिसांनी त्यांचे स्वतःचे तीन आणि इतर सहा असे 9 मोबाइल जप्त केले. त्यांच्याकडे तीन बैंक पासबुक आढळले. त्यांचे सहा बैंक खाते असून हे सतत खाते उघडायचे आणि नंतर बंद करायचे, असेही स्पष्ट झाले आहे.






