या गावात शिवी दिल्यास होणार 500 रुपये दंड

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सातारा गाव ‘आदर्श ग्राम’ म्हणून नावारूपाला येत आहे. सरपंच गजानन गुळधे यांच्या पुढाकाराने व गावातील नागरिकांच्या लोकसहभागाने राज्यस्तरावर गावाचे नाव लौकिक होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील मुल्याधिष्ठित विकासाची शिकवण व गाडगे महाराज यांच्या स्वच्छतेची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून सातारा गावाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. अशातच सातारा ग्रामपंचायतीतर्फे गावात ‘शिवी द्याल तर खबरदार’ असा ठराव ग्रामपंचायतीने घेतला आहे. ज्यांनी अर्वाच्च व अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्यास दोषीकडून 500 रुपये दंड करून वसूल करण्याचा निर्णय घेतल्याने सातारा गावाची ‘शिवीमुक्त’कडे वाटचाल सुरू असून येथील नागरिक एकमेकांसोबत आदरभावाने वागत असतात.
‘आदर्श ग्राम’ म्हणून नावारूपास येताना सातारा ग्रामपंचायतीतर्फे ‘ आयोजित ग्रामसभेत गावातील कोणताही नागरिक महिलांचा अपमान करणारी शिवीगाळ केल्यास त्याला 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा ठराव पारित करण्यात आला. दंड भरणे टाळल्यास ग्रामपंचायतीकडून कोणतेही शासकीय दाखले त्या व्यक्तीला देण्यात येणार नाही, असे ठरविण्यात आले. सरपंच गजानन गुळधे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, हा निर्णय लाडक्या बहिणीच्या सन्मानासाठी व गावातील सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे. गावात सुरू असलेल्या विकास कामांमुळेही सातारा ही केवळ एक ग्रामपंचायत न राहता, एक प्रेरणास्थान बनली आहे. गावात वयोवृद्धांसाठी विश्रांती निवारा उभारण्यात आला आहे. जिथे टीव्ही, पंखे आणि सकाळी, संध्याकाळी अशा दोन वेळा मोफत चहा अशीही व्यवस्था करण्यात आली आहे.




