दगडी काम करणाऱ्या लातूरच्या मुस्लिम भक्ताकडून विठ्ठलाला चांदीचा मुकुट अर्पण

अंतःकरणात सेवेचा शुद्धभाव असला की काय होऊ शकते हे लातूरच्या मुस्लिम समाजाच्या तरुणाने दाखवून दिले आहे. आषाढी वारीमध्ये सर्व जाती- घर्माचे लोक एकत्र येतात आणि भक्तीमध्ये तल्लीन होतात. या मुस्लिम तरुण भक्ताने सेवा सेवा तर केलीच शिवाय मंदीराचे दगडी काम करीत असताना आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या चरणी चांदीचा मुकूटही अर्पण केला आहे.
गणी सय्यद हा दगडी काम करणारा कारागीर आहे. त्यांनी लातूरच नव्हे तर परजिल्ह्यातील मंदीरातही दगडी कामे केली आहेत. कामाचा दर्जा आणि वेगळेपणा यामुळे विठ्ठल मंदिरातील दगडी कामही त्यांना मिळाले आहे. गेल्या दीड वर्षापासून मंदिर परिसरात काम करीत असताना गणी सय्यद हे विठ्ठलाचे भक्त कधी झाले त्यांच्याही लक्षात आले नाही. दर एकादशीला मंदिरात होणारे भजन, किर्तनाचे कार्यक्रम आपसूकच त्यांच्या कानावर पडत असत. विठ्ठलाप्रति त्यांच्याही मनात एक आस्था निर्माण झाली.
तर दुसरीकडे शुक्रवारी न चुकता नमाज पठण करायलाही ते कधी विसरले नाहीत. दगडी काम करणारा असलो तरी विठ्ठलाच्या सेवेत काहीतरी हातभार लागावा या उद्देशाने त्यांनी आषाढी वारीचे निमित्त साधून १ लाख रुपयांचा एक किलो चांदीचा मुकूट विठुरायाच्या चरणी अर्पण केला आहे. केवळ मंदिरात दगडी काम करतो म्हणून नव्हे तर विठ्ठलाप्रति निर्माण झालेल्या भावार्थाने आपण हे केल्याचे गणी सय्यद यांनी सांगितले. मुकूट अर्पण करताना गहिनीनाथ महाराज औसेकर, लक्ष्मीकांत पवार यांच्या इतरांचीही उपस्थिती होती.
अंतःकरणात शुद्ध भाव म्हणूनच दिला मुकुट
1) विठ्ठल मंदिरात दगडी काम करीत असताना कानावर पडलेले भजन, किर्तन यातून एक वेगळेच समाधान मिळत होते.
2) या गोष्टी काही बोलून दाखवायच्या नाहीत पण आषाढी एकादशीचे औचित्य साधून विठुरायाला चांदीचा मुकूट अर्पण करण्याचा निर्णय घेतला होता.
3) सद्गुरु गहिनीनाथ महाराज यांच्यामुळे ते सहज शक्यही झाल्याचे गणी सय्यद यांनी सांगितले






