गर्भवती महिलेच्या पोटावर जेलीऐवजी लावले ॲसिड; जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील घटना

भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीच्या अनेक घटना समोर येत असतात. शुक्रवारी (दि.२७) दुपारी ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रसूतीसाठी दाखल असलेल्या एका गर्भवती महिलेला जेलीऐवजी ॲसिड लावल्याने ती गंभीर भाजली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिला संदीप भालेराव (वय २८) असे या जखमी महिलेचे नाव आहे. शीला भालेराव या प्रसूतीसाठी गुरुवारी रात्री भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. मात्र, प्रसूती करण्यापूर्वी नर्सने जेलीऐवजी पोटावर ॲसिड लावले. त्यामुळे काही वेळेतच जळजळ होऊ लागली. शीला यांच्या पोटावर वेदना होऊ लागल्या व सूजही आली. हा गंभीर प्रकार लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने शीला यांच्यावर उपचार सुरू केले. तर, दुसरीकडे या धक्कादायक प्रकरणानंतर अर्धातासानंतर महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ सुखरूप असून, त्याच्या प्रकृतीत कोणताही धोका नाही. मात्र, महिलेल्या पोटासह अवघड जागा भाजल्याने महिलेवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. या घटनेनंतर महिलेचे नातेवाईक संतप्त झाले होते. या प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णाची सुरक्षा आणि उपचार प्रक्रियेतील बेजबाबदारी पुन्हा एकदा समोर आली आहे.