अमित शाह बनले सर्वाधिक काळ गृहमंत्री पदावर राहिलेले व्यक्ती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी 5 ऑगस्ट हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. देशाच्या इतिहासात सर्वात प्रदीर्घ काळासाठी केंद्रीय गृहमंत्रीपद भूषवणारे ते राजकीय नेते बनले आहेत. 30 मे 2019 ते आजपर्यंत म्हणजेच 2261 दिवस गृहमंत्रीपदाची धुरा त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. भाजपचे वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी व काँग्रेसचे दिवंगत नेते गोविंद बल्लभ पंत यांनासुद्धा मागे टाकत शाह यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमित शाह यांची सरकारमध्ये एंट्री झाली. 30 मे 2019 रोजी त्यांनी गृहमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतली. नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातही ते गृहमंत्रीपदी कायम राहिले. 10 जून 2024 रोजी अमित शाह यांनी दुसऱ्यांदा गृहमंत्रीपदाची शपथ घेतली. सध्या गृहमंत्री म्हणून अमित शाह यांनी 2261 दिवस (30 मे 2019 ते 8 ऑगस्ट 2025) पूर्ण केले आहेत.
लालकृष्ण अडवाणी व गोविंद बल्लभांचा विक्रम मोडला
यापूर्वी सर्वात प्रदीर्घ काळासाठी गृहमंत्रीपद भूषवण्याचा विक्रम लालकृष्ण अडवाणी यांच्या नावे होता. त्यांनी 2256 दिवस (19 मार्च 1998 ते 22 मे 2004) पर्यंत गृहमंत्रीपद भूषवले. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. काँग्रेसचे नेते गोविंद बल्लभ पंत हे 6 वर्षे 56 दिवस गृहमंत्री होते. सरदार वल्लभभाई पटेल 1218 दिवस म्हणजेच सुमारे साडे तीन वर्षे गृहमंत्री राहिले. परंतु, आता अमित शाह यांनी त्यांच्याहून अधिक काळ या पदावर काम करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.उल्लेखनीय बाब अशी की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कणखर, धाडसी व ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. त्यांच्या कार्यकाळात दहशतवादावर कठोर कारवाई करण्यात आली. देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी त्यांनी अनेक ठोस पावले उचलली. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम लागू करणे, नवे गुन्हेगारी कायदे व डावा कट्टरतावाद व नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी शाह यांनी अनेक मोहिमा राबवल्या.






