शिवाजीनगर मेट्रो स्टेशन बंगळुरुचे ‘सेंट मेरी’ नामांतर होणार | शिवभक्तामध्ये असंतोष

कर्नाटकची राजधानी बंगळुरू महानगरातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला कर्नाटक सरकारने नुकतेच ‘सेंट मेरी’ असे नाव दिले आहे.
या प्रकरणावरून कर्नाटकात सत्तेत असलेल्या काँग्रेस अर्थात सिद्धरमय्या सरकारच्या विरोधात शिवभक्तांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. दरम्यान, या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
विजयनगर साम्राज्याच्या काळात एक खेडेगाव असलेले आताचे बंगळुरू अर्थातच कर्नाटक राज्याच्या राजधानीचे शहर…
आदिलशाहीच्या काळात बंगळुरूची जहागिरी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजेंकडे होती.
शहाजीराजे भोसले यांच्या प्रचंड पराक्रमाचा इतिहास असलेल्या या शहरात शिवाजीनगर नावाचा एक भाग आहे. सध्या बंगळुरू शहरात मेट्रो रेल्वेचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
शिवाजीनगर बस टर्मिनन्स केम्पेगौडा मॅजिस्टिक, बंगळुरू मेन, येलहंका, हेब्बल, कमर्शियल स्ट्रीट, एम. चिन्नास्वामी स्टेडियम, कब्बन पार्क, पर्पल लाईन या भागांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे.
निर्माणाधीन मेट्रो मार्गाच्या या मार्गावरील शिवाजी नगर भागाच्या मेट्रो स्टेशनला सुरुवातीला शिवाजीनगर मेट्रो स्टेशन असे नाव देण्यात आले होते. परंतु या स्टेशनचे नुकतेच ‘सेंट मेरी’ असे नामकरण करण्यात आले आहे.
हा प्रकार शिवरायांच्या नावाचाच नव्हे, तर शिवप्रेमींच्या भावनांचा अवमान असल्याने बंगळुरूसह महाराष्ट्रातीलही शिवप्रेमींमध्ये कर्नाटक सरकारविरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे.





