शिक्षकी पेशाला काळीमा | शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात खासगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या दोन शिक्षकांवर गुरुवारी (दि.२६) रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुध्द पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला. दरम्यान शुक्रवारी (दि.२७) सकाळी शिवाजीनगर पोलिसांनी उमाकिरण संकुलात ज्या ठिकाणी घटना घडली तेथे पाहणी करत सीसीटिव्हीचा डीव्हीआर जप्त केला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत. या घटनेने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे
पोलिसांच्या माहितीनुसार, एका १७ वर्षीय विद्यार्थिनीनी याबाबत शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद नोंदविली. उमाकिरण शैक्षणिक संकुलात फिजिक्स शिकवणारे प्रशांत खाटोकर आणि विजय पवार या दोघांनी एक वर्षापासून पीडितेचे लैंगिक शोषण केले. शिकवणी वर्गासाठी आल्यानंतर प्रशांत खाटोकर फिजिक्सचा क्लास संपल्यानंतर कॅबिनमध्ये बोलावून अश्लिल चाळे करायचे. कपडे काढायला लावून फोटो काढायचे. याबाबत कुणाला सांगितले तर धमक्या द्यायचे. याबाबत विजय पवार यांना सांगितली असता ह्यत्यांना आम्हीच ठेवलयं मुलींना त्रास देण्यासाठी असे म्हणत ते सुध्दा आपल्यासोबत वाईट वर्तन करू लागले असे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात दोघांविरुद्ध गुरुवारी रात्री पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
सध्या आरोपी फरार असून शुक्रवारी सकाळी त्यांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी पोलिसांनी ठाण्यात बोलविण्यात आले. तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उमाकिरण शैक्षणिक संकुलात ज्या शिकवणी वर्गात ही घटना घडली तेथे पोहचले. गुन्ह्याच्या अनुषंगाने पुरावे गोळा करण्याचे काम पोलिस यंत्रणेकडून सुरु करण्यात आले. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर ठाणे निरीक्षक किशोर पवार यांनी दिली