पुणे मेट्रोचा वाघोली पर्यंत विस्तार होणार || पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्राची मंजुरी

पुणेकरांच्या पसंतीला उतरलेली पुणे मेट्रोची प्रगती पुण्याची ‘लाईफलाइन’ बनण्याकडे चालली आहे. तब्बल १ लाख ७० हजार प्रवासी पुणे मेट्रोचा दररोज वापर करत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पुणे मेट्रोच्या वनाज ते चांदणी चोका (मार्गिका रोअ) आणि रामवाडी ते वाघोली/ विठ्ठलवाडी (मार्गिका २ब) या महत्त्वाच्या मार्गिकांना मंजुरी दिली आहे. यामुळे पुणे शहरातील नागरिकांना शहराच्या पूर्व-पश्चिम भागात प्रवास करणे आणखी सोयीचे होणार आहे.
वनाज ते चांदणी चौक (मार्गिका २अ) या विस्तारित मार्गावर २ स्थानके (कोथरूड बस डेपो, चांदणी चौक) असून, त्याची लांबी १.२ किमी असणार आहे. यामुळे वनाज ते चांदणी चौक परिसरातील नागरिकांना मेट्रोचीसुविधा उपलब्ध होईल. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर म्हणाले की, रामवाडी ते वाघोली / विठ्ठलवाडी (मार्गिका २ब) या मार्गावर ११ स्थानके (विमान नगर, सोमनाथ नगर, खराडी बायपास, तुळजाभवानी, उबाळे नगर, अप्पर खराडी रोड, वाघेश्वर मंदिर, वाघोली, सिद्धार्थ नगर, बकोरी फाटा, विठ्ठलवाडी) असतील आणि त्याची लांबी ११.६३ किमी असेल. या विस्ताराने वाघोली आणि विठ्ठलवाडी हा भाग मेट्रोने उर्वरित शहराला जोडला जाणार आहे. या दोन्ही उन्नत मार्गिकांची एकूण लांबी १२.७५ किमी असून, यामध्ये १३ नवीन स्थानके जोडली जातील. या संपूर्ण प्रकल्पाचा एकूण खर्च ३६२४.२४ कोटी रुपये अपेक्षित असून, तो पूर्ण होण्यासाठी अंदाजे ४ वर्षांचा कालावधी लागेल. दोन्ही मार्गिकांमुळे पुणे शहराचे मोठ्या प्रमाणावर विस्तारित पूर्व व पश्चिम भाग मेट्रोने उर्वरित शहराशी जोडला जाणार आहे. या भागातील हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या कार्यालयातील प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट’च्या (पीएमयू) माध्यमातून ते संबंधित अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन प्रकल्पातील अडथळे दूर करण्याचा आणि कामांना गती देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. बुधवारीही त्यांनी ‘पीएमयू’ची बैठक घेऊन पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेतला. पुण्यासह मंत्रालयातील सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.