Sports

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

कर्नाटकची राजधानी बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी), इव्हेंट व्यवस्थापन कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघाविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल झाला. कर्नाटक उच्च न्यायालयानेही याप्रकरणी गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून १० जूनपर्यंत विस्तृत स्थिती अहवाल मागविला आहे. शिवाय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना आठवडाभरात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

चेंगराचेंगरी प्रकरणात बंगळुरू पोलिसांनी सदोष मनुष्यवधासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यात आरसीबीला पहिल्या क्रमांकाचे आरोपी बनवले आहे. डीएनए कंपनीला दुसऱ्या आणि राज्य क्रिकेट असोसिएशन प्रशासकीय समितीला तिसऱ्या क्रमांकाचे आरोपी करण्यात आले आहे. हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. राज्य सरकारने दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ आयएएस अधिकारी जी. जगदीश यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर उच्च न्यायालयाने या प्रकरणात राज्याला नोटीस बजावत १० जूनपर्यंत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने कार्यक्रमाच्या अर्धवट व्यवस्थापनावरून सरकारवर ताशेरे ओढले. यावेळी सरकार ही घटना अत्यंत गांभीर्याने घेत असून इव्हेंट कंपनीसह सर्व पक्षकारांना नोटीस बजावण्यात आल्याची बाजू महाधिवक्ता शशी किरण शेट्टी यांनी मांडली. तसेच तपास पूर्ण पारदर्शकपणे करण्याची ग्वाही त्यांनी दिली. दुर्घटनेप्रकरणी जनहित याचिका दाखल झाली असेल तर या प्रकरणाची आम्ही स्वतःहून दखल घेत आहोत, असे न्यायालयाने म्हटले. यावेळी घटनेच्या निष्पक्ष चौकशीसाठी स्वतंत्र संस्था नियुक्त करण्याची मागणी देखील करण्यात आली. परंतु स्थिती अहवाल सादर झाल्यानंतर पुढील निर्देश देण्यात येतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याप्रकरणी पुढील सुनावणी १० जून रोजी होणार आहे.

तर आरसीबीनेदेखील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे आयपीएलचे विजेतेपद आरसीबीने प्रथमच जिंकल्यानंतर बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र स्टेडियमबाहेर झालेल्या, चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जण जखमी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button