News

सायबर टोळीने पोलिसाला घातला 55 लाखांचा गंडा

अज्ञात सायबर टोळीने एका पोलीस कर्मचाऱ्याला 55 लाखांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर आलेल्या बनावट गुंतवणूक जाहिरातीवर विश्वास ठेवून ही फसवणूक घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी नवी मुंबईच्या सायबर पोलिसांनी अज्ञात सायबर टोळीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

54 वर्षीय पोलीस कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह खारघर परिसरात राहत असून, ते मुंबई पोलीस दलात संरक्षण शाखेत कार्यरत आहेत. गेल्या 15 जानेवारी रोजी त्यांना फेसबुकवर 18 हजार रुपये गुंतवल्यास दररोज 1200 रुपयांचा नफा मिळेल, अशी मुकेश अंबानी यांच्या नावाने गुंतवणुकीबाबतची एक जाहिरात निदर्शनास आली. त्यावर त्यांनी या जाहिरातीच्या लिंकवर जाऊन त्यात मोबाईल क्रमांक नोंदवला. काही वेळातच या सायबर टोळीतील आशिष मिश्रा या व्यक्तीने फिन ब्रिज कॅपिटल या कंपनीचा ॲडव्हायझर असल्याचे भासवून या पोलिसाला संपर्क साधत त्यांना सुरुवातीला 22 हजार रुपये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे सांगितले. त्यावर त्यांनी सुरुवातीला क्रेडिट कार्डद्वारे 19500 रुपये गुंतवले. त्यानंतर सायबर टोळीने दररोजच्या नफ्याचे बनावट स्क्रिन शॉट पाठवले. त्यानंतर या टोळीने सांगितल्याप्रमाणे या पोलिसाने दुसऱ्या गुंतवणुकीच्या प्लॅनमध्ये टप्याटप्याने विविध बँक खात्यांवर साडेतीन लाख रुपये भरले. या गुंतवणुकीवर त्यांना 83 लाख 96 हजार रुपये नफा झाल्याचे भासवण्यात आले व त्यांनी तयार केलेले वेबपेज दाखवत त्यांच्याकडून आणखी पैशांची मागणी केली.

बँकेच्या नावाने पाठवल्या बनावट पावत्या

रक्कम भरल्यानंतर या टोळीने त्यांना बार्कलेस बँकेच्या नावाने बनावट पावत्याही पाठवल्या. अशा प्रकारे या पोलिसाने सायबर टोळीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी एकूण 55 लाख 65 हजार रुपये पाठवून दिले. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा न मिळाल्याने या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एनसीसीआरपी पोर्टलवर तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button