सायबर टोळीने सीएकडून शेअर बाजारात गुंतवणुकीचा बहाणा करून 2 कोटी रुपये उकळले
सायबर टोळीने सीएकडून शेअर बाजारात गुंतवणुकीचा बहाणा करून 2 कोटी रुपये उकळले

ऑनलाइन शेअर मार्केट ट्रेडिंगच्या गुंतवणुकीत चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून एका सायबर टोळीने नेरूळमध्ये राहणाऱ्या सीएकडून तब्बल २ कोटी ३ लाख रुपये उकळले. नवी मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
फसवणूक झालेले सीए नेरूळमध्ये राहण्यास असून गत एप्रिल महिन्यामध्ये सायबर टोळीतील सदस्यांनी त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून शेअर मार्केटमधील गुंतवणूक संदर्भात विचारणा केली होती. त्यानंतर एजेंल फोरम नावाच्या व्हॉट्स अॅपग्रुपमध्ये समावेश करून घेतला. शेअर मार्केट ट्रेडिंगमधील गुंतवणुकीसंदर्भात माहिती देऊन ऑनलाइन शेअर मार्केट ट्रेडिंगमधील गुंतवणुकीद्वारे चांगल्या परताव्याचे आमिष दाखवण्यास सुरुवात केली. सीएने शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवल्यानंतर सायबर टोळीने गनस्टन्स.कॉम या वेबसाईटवर त्यांचे अकाऊंट सुरू केल्याचे भासवले. शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार, या सीएने बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यास सुरुवात केली.
तीन कोटींचा फायदा दाखवला
शेअर्स खरेदी केल्यानंतर झालेला फायदा त्यांना सायबर चोरट्यांकडून गनस्टन्स या वेबपेजवर दाखवण्यास सुरुवात केली. सीएने सायबर चोरट्यांच्या सूचनेनुसार महिनाभरामध्ये वेगवेगळ्या बैंक खात्यांमध्ये तब्बल २ कोटी ३ लाख रुपये पाठवून दिले. सीएला तब्बल ३ कोटींपेक्षा अधिकचा फायदा झाल्याचे वेबपेजवर दाखवण्यात आले. त्यानंतर सीएने त्यातील काही रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पैसे काढता आले नाहीत. पैसे काढण्यासाठी त्यांना कर स्वरूपात काही रक्कम भरावी लागेल, असे सायबर टोळीकडून सांगण्यात आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे सीएच्या लक्षात आले.