राज्यात मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यात सर्वाधिक पाऊस
राज्यात मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यात सर्वाधिक पाऊस

राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक 42.2 मिमी पाऊस झाला आहे, तर बीड 24 मिमी, जालना 13.9 मिमी, सोलापूर 12.1 मिमी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. एकंदरीत मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले. मात्र, पावसामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. राज्यात सर्व जिल्ह्यात पावसाची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात असून कुठेही पूरपरिस्थिती उद्भवलेली नाही. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र सर्व जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात आत्तापर्यंत भिंत कोसळणे, झाड पडणे, वीज कोसळणे, पाण्यात बुडणे, आगीत जळणे, पुराचे पाण्यामुळे, रस्ते अपघात या घटनेत तीन व्यक्ती व तीन प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील एक आणि नांदेड जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे.तसेच सात व्यक्ती जखमी झाली असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.
दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार नाही. पण 12 जून नंतर मान्सून पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने लवकर पेरणी करण्यापासून सावधगिरी बाळगण्याचा इशारा शेतकऱ्यांना दिला आहे.विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्राच्या इतर भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD च्या विस्तारित अंदाजानुसार 1 जून ते 5 जून दरम्यान राज्यात पाऊस सामान्य पेक्षा कमी राहील. त्यामुळे पावसाची प्रतिक्षा लांबली आहे.






