कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी घाबरू नये ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन
कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी घाबरू नये ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. स्थिती नियंत्रणात आहे. पण, वयस्कर लोकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी पवार बोलत होते.
ते म्हणाले की, २०२० ला कोरोनाची लाट आली होती. त्यावेळी सर्व जगाला वेढले होते. त्यावेळी आपण दर आठवड्याला मीटिंग घेत होतो. त्यातून आपण बाहेर पडलो. आत्तापण कोरोना आला आहे देशात सर्वाधिक पेशंट केरळातील आहेत महाराष्ट्रातही आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवडविषयी बोलायचे तर सर्वकाही नियंत्रणात आहे. राज्य पातळीवर मुख्यमंत्री स्वतः आढावा घेत आहेत. स्वतः आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याविषयी आढावा बैठक झाली. त्यामध्ये विविध यंत्रणांना सूचना केल्या आहेत. सर्दी व खोकला असणाऱ्या रुग्णांनी गर्दी टाळण्याची गरज आहे. खोकला व शिंका आल्या तर रुमाल वापरण्याची गरज असल्याचेही पवार यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सौम्य वाढ होत असून १४ जून रोजी ५३ नवीन रुग्ण आढळले. यामध्ये मुंबईतील २४, पुणे महापालिका ११, पिंपरी-चिंचवड ३, ठाणे महापालिका ५, नवी मुंबई १, रायगड १, पुणे ग्रामीण २, सांगली २, सांगली महापालिका २ आणि नागपूर महापालिका २ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५७८ झाली आहे. जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण २१ हजार ६७कोविड चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी १,९६७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी १,३६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, बरे होण्याचे प्रमाण ६९.२४ टक्के इतके आहे. या कालावधीत मुंबईतील एकूण ८२९ रुग्णांची नोंद झाली असून, त्यातील तब्बल ८२३ रुग्ण केवळ मे महिन्यात आढळले आहेत. राज्यात जानेवारी २०२५ पासून २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये नेफ्रोटिक सिंड्रोमसह हायपोकॅल्सिमिक झटके, कर्करोग, ब्रेन स्ट्रोक, डायबेटिक किटोएसिडोसिस, फुप्फुस विकार, मधुमेह अशा गंभीर सहव्याधींचा समावेश होता