लॉकडाऊनमध्ये मी पकडली होती आदिती तटकरेंची कार? लॅम्बोर्गिनीमध्ये होतं कोट्यवधींचं ड्रग्ज ? रणजित कासलेंचा नवा गौप्यस्फोट
लॉकडाऊनध्ये मी एक गाडी अडवली होती. गाडीची तपासणी करत असताना गाडी चालक पळून गेला. मी सहा तास पाठलाग करुन पुन्हा ती गाडी पकडून आणली होती.

बीड पोलिस खात्यातून बडतर्फ झालेलेपीएसआय रणजित कासले यांना जामीन मिळाल्यानंतर ते वेग वेगळ्या ठिकाणांवर फिरुन गौप्यस्फोट व्हिडिओ करीत आहेत.
जेलमध्ये वाल्मिक कराडला मिळत असलेली व्हिआयपी ट्रीटमेंट आणि अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्याबाबतचे आरोप करुन कासलेंनी राज्यात खळबळ उडवून दिली. त्यानंतर आता ते थेट राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर बोलले आहेत.
रणजित कासले एका व्हिडीओमध्ये म्हणतात, पहिल्या किंवा दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात होतो. तेव्हा मी युनिफॉर्मवर ड्युटी करीत होतो. तेव्हा ड्रग्जच्या बाबतीत मला एक अनुभव आला होता. त्यामध्ये एवढ्या मोठ्या व्यक्तीचं नाव आहे, त्याचा कुणी विचारही करु शकणार नाही. यामध्ये काही बॉलिवूड कलाकार, पोलिस आणि राजकीय लोक अडकू शकतात.
कासले पुढे म्हणतात, लॉकडाऊनध्ये मी एक गाडी अडवली होती. गाडीची तपासणी करत असताना गाडी चालक पळून गेला. मी सहा तास पाठलाग करुन पुन्हा ती गाडी पकडून आणली होती. ती एक लॅम्बोर्गिनी कार होती. त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज होतं. परंतु हे प्रकरण दाबण्यात आले.
कासले पुढे दावा करतात, त्या गाडीमध्ये एक कार्ड सापडलं होतं. ते एका आमदाराचं कार्ड होतं. आज ते महाराष्ट्रामध्ये मंत्री आहेत.. ते किंवा ती असू शकतात. अजित पवारांच्या पक्षाचा तो किंवा ती मंत्री आहे. त्या कार्डवर प्रधान सचिवांची सही होती, शिवाय महाराष्ट्र विधानसभेचा शिक्काही होता.हा व्हिडीओ इथेच संपतो.
पुढच्या व्हिडीओमध्ये कासले सांगतात की, मी जो फोटो दाखवला नव्हता, तो फोटो आदिती तटकरे यांचा आहे. त्या कार्डवर आदिती यांचा फोटो असल्याचा दावा कासलेंचा आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी आयकार्डवरचा फोटो दाखवला नसला तरी थेटपणे मंत्री आदिती तटकरे यांचं नाव घेतलं आहे.






