अमेरिकेवर हल्ला झाल्यास इराणवर ताकदीने तुटून पडू – डोनाल्ड ट्रम्प
इराणवरील हल्ल्याशी आमचे देणेघेणे नाही

इराणने अमेरिकेवर हल्ला करीत डिवचले तर आमचे लष्कर संपूर्ण ताकद पणाला लावून इराणवर तुटून पडेल, असा टोकाचा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी दिला आहे. अमेरिकेच्या कोणत्याही तळांवर व संबंधित ठिकाणांवर हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देणे अटळ असल्याचे त्यांनी ठणकावले. याचवेळी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांशी आमचे काहीही देणेघेणे नाही, असे सांगत ट्रम्प यांनी हात झटकले आहेत.
इस्रायल व इराण यांच्यात तुंबळ हल्ले सुरू असून यामुळे मध्य-पूर्वेत युद्धाचे ढग दाटून आले आहेत. अशातच इराणविरोधी युद्धात आमच्या बाजूने मैदानात उतरण्याची विनंती इस्रायलने अमेरिकेला केली आहेअशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म ‘टूथ सोशल’ वरून भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमागे आमचा हात नाही. या हल्ल्यांशी आमचे काहीही देणेघेणे नाही. परंतु, जर इराणने आम्हाला डिवचले तर चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. यदाकदा इराणने आमच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला केला तर अमेरिकेचे सशस्त्र दल संपूर्ण ताकदीने पलटवार करतील. तुम्ही (इराण) कल्पनाही केली नसेल असे तुमचे हाल आम्ही करू, असे ट्रम्प यांनी ठणकावले आहे. आम्ही सहजपणे इराण व इस्रायलदरम्यान तडजोड करू शकतो व हा रक्तरंजीत संघर्ष संपुष्टात आणू शकतो. परंतु, त्यासाठी दोन्ही देशांनी चर्चा व कुटनीतीचा वापर केला पाहिजे. विशेषतः इराणने आपली आण्विक महत्त्वाकांक्षा दूर सारून अमेरिकेशी कुटनीतिक चर्चा करावी, असा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला. इराणने तडजोड करण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा त्यांच्या देशात सर्व काही होत्याचे नव्हते होऊन जाईल, असे सांगत ट्रम्प यांनी इराणवर अणुकरार करण्यासाठी दबाव वाढवला आहे.