सांगलीतील इस्लामपूर होणार आता ईश्वरपूर आणि छत्री निजामपूरचे रायगडवाडी होणार

महायुती सरकारने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर, तर रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या छत्री निजामपूर गावाचे नाव रायगडवाडी, असे करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी विधानसभेत या निर्णयाची घोषणा करण्यात आली, तसेच यासंदर्भातील प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला जाणार आहे.
यापूर्वी औरंगाबाद आणि उस्मानाबाद यासारख्या शहरांची नावे बदलून अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी करण्यात आली आहे.विधानसभेत इस्लामपूर शहराचे नामकरण ईश्वरपूर करण्यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी निवेदन केले. तसेच गाव, शहरांची नाव बदलण्याचे अधिकार केंद्र शासनाकडे असल्याने याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. इस्लामपूर शहराच्या या नामांतरानंतर नगरपरिषद, विधानसभा मतदारसंघ आणि सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये आता ईश्वरपूर हे नाव वापरले जाणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव बदलून रायगडवाडी करण्यात आले आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबतची विधानसभेत घोषणा केली.




