55 वर्षीय नवरदेवाने केले 16 वर्षीय अल्पवयीन मुलीशी विवाह; नवरदेवाविरुद्ध गुन्हा दाखल
55 वर्षीय नवरदेवाने केले 16 वर्षीय अल्पवयीन मुलीशी विवाह; नवरदेवाविरुद्ध गुन्हा दाखल

पंचावन्न वर्ष वयाच्या एका व्यक्तीने सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
२८ एप्रिल रोजी लग्न करणाऱ्या नवरदेव तसेच लग्न लावून देणाऱ्या अल्पवयीन मुलीचे वडील, नातेवाईक व भटजीविरोधात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगवान बाबाजी भालेराव (५५ रा. लासूर स्टेशन ता. गंगापूर) असे नवरदेव आरोपीचे नाव आहे. आरोपीने वैजापूर तालुक्यातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीशी डोणगाव रोडवरील महादेव मंदिरात २८ एप्रिल रोजी विवाह केला. सदर बाब ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना प्रकल्प समन्वयक चाइल्ड हेल्पलाइन कक्षाकडून पत्राद्वारे समजली.
त्यावरून त्यांनी खात्री केली असता त्यांना भगवानने सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याचे खात्रीशीर समजले. त्यांनी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून नवरदेव, मुलीचे वडील, नातेवाईक व भटजी यांच्या विरोधात पाच मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत प्रभारी प्रकल्प समन्वयक आम्रपाली बोर्डे, बाल संरक्षण अधिकारी दीपक बाजारे, शिल्लेगाव पोलीस कर्मचारी कौतीकराव सुरडकर यांचा समावेश होता. याप्रकरणी अधिक तपास रवी कीर्तीकर करत आहे.






