विवाहितेला घरात डांबून अंगावर दिले चटके | अंगावर 13 गंभीर जखमा, पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा
विवाहितेला घरात डांबून अंगावर दिले चटके | अंगावर 13 गंभीर जखमा, पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा

पैशाची मागणी करत विवाहितेला पतीने घरात डांबून व दोरीने बांधून चटके दिले. ही निर्दयी घटना फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौका येथे घडली. वैद्यकीय अहवालात विवाहितेच्या अंगावर १७ जखमा आढळून आल्या आहेत. याप्रकरणी विवाहितेने फुलंब्री ठाण्यात पतीसह तिघांविरोधात तक्रार दिली आहे.
सध्या माणसातील माणुसकी संपलेली असून, दररोज कुठे ना कुठे विवाहितेला निर्दयीपणे मारहाण करणे, पैशांची मागणी करणे, जीवे मारण्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौका येथे राहणारी हिना शेख (३०) हिच्यासोबत घडली. हिना शेख हिचे माहेर फुलंब्री असून तिचे चौकावाडी येथे राहणारे अजिम अब्दुल शेख यांच्याशी ८ वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. त्यांना एक पाच वर्षांचा मुलगा आहे. हिनाचा पती अजिम हा तिला पैशाची मागणी करत सतत शिवीगाळ करत मारहाण करत होता. मागील दीड दोन वर्षांपूर्वी पती अजिमने हिना गर्भवती असताना पोटावर जबर मारहाण करत पोटातील बाळाला दुखापत केली होती, यात ते दगावले होते.
पुढेही तिला सतत मारहाण होत होती.मात्र, हिना याबाबत आई- वडिलांना सांगत नव्हती. कारण पती माहेराहून पैसे घेऊन ये म्हणत मारहाण करीत होता.वडील घरी येताच उघड झाला प्रकार हिनाच्या माहेरी लग्न असल्याने तिचे वडील तिला घेण्यासाठी बुधवारी गेले होते. यावेळी ती एका खोलीत डांबलेल्या अवस्थेत दिसून आली. विचारपूस केली असता हिनाने वडिलांना रडत रडत घडलेली आपबीती सांगितली.
यावेळी तिला दोरीने बांधून गळ्यावर, हातावर, पायावर व शरीरावर सतरा ठिकाणी निर्दयीपणे चटके दिलेले दिसले. वडिलांनी हिनाला सोबत घेऊन पती अजिम शेख, नणंद शबाना निसार शेख (रा. हडको कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर) व दुसरी नणंद रिजवाना इमरान शेख यांच्या विरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.






