पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नौदल भवनातील कर्मचाऱ्याला अटक
पाक एजंटने प्रिया शर्मा नावाने संपर्क साधून ओढले जाळ्यात पैशासाठी 'ऑपरेशन सिंदूर 'सह इतरही संवेदनशील माहिती पुरवली

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दिल्लीच्या नौदल भवनातील एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. विशाल यादव नामक या कर्मचाऱ्याने ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित संवेदनशील माहितीसह इतर गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंटला पुरवल्याचा आरोप आहे.
राजस्थान पोलिसांच्या गोपनीय शाखेने विशाल यादवला बुधवारी अटक केली. पोलीस महानिरीक्षक विष्णुकांत गुप्ता यांनी गुरुवारी याबाबत दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी एजंटने हनी ट्रॅपद्वारे विशालला आपल्या जाळ्यात ओढून पैशाच्या बदल्यात त्याच्याकडून संवेदनशील माहिती मिळवली. यासाठी प्रिया शर्मा नामक बनावट आयडीवरून विशाल यादवला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली. ही कथित प्रिया विशालसोबत व्हॉट्सॲप व टेलिग्रामवरून संपर्कात होती
सुरुवातीला त्याला किरकोळ माहिती पुरवल्याच्या बदल्यात पाच-सहा हजार रुपये देण्यात आले. यानंतर अधिक पैशाचे आमिष दाखवून महत्त्वाची माहिती पुरवण्यास सांगितले. त्यानुसार विशाल संरक्षण खात्यातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंटला पुरवत होता. ‘ऑपरेशन सिंदूर’ शी संबंधित माहिती पुरवल्याबद्दल त्याला ५० हजार रुपये मिळाले, आतापर्यंत दोन लाख रुपये मिळाल्याची कबुली दिली आहे. राजस्थान पोलीस त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाळत ठेवून होती. विशाल पाकिस्तानी गुप्तहेराच्या नियमित संपर्कात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. विशाल यादव मूळचा हरयाणातील रेवाडी गावच्या पुनसिकाचा रहिवासी आहे. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता वित्तीय व्यवहार, संवेदनशील माहितीचे सबळ पुरावे मिळाले आहेत. त्याला क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील मोबदला दिल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्याला ऑनलाईन गेमिंगचे व्यसन आहे. तो कर्जबाजारी झाल्याचे हेरूनच पाकिस्तानी एजंटने त्याला आपल्या जाळ्यात ओढले असण्याची शक्यता आहे, गेल्या काही आठवड्यांत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या पंधराहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये संरक्षण दलाचे कर्मचारी, सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे