मुजोर संस्थाचालकाच्या मारहाणीत पालकाचा मृत्यू ; पुर्णा तालुक्यातील घटना

तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या आपल्या मुलीची टी. सी. मागण्यासाठी गेलेल्या एका 42 वर्षीय कीर्तनकार पालकास संस्थाचालक दाम्पत्याने बेदम मारहाण केली.
यात पालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना झिरोफाटा येथील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत घडली. संस्थाचालक पती-पत्नीसह कर्मचाऱ्यांनी ॲडमिशन घेतेवेळी भरलेल्या पैशांची मागणी केली व उर्वरित पैसे न भरल्याचा राग मनात धरून बेदम मारहाण केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्था चालक पती-पत्नीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगन्नाथ पांडुरंग हेंडगे (42, रा. उखळद, ता.जि. परभणी) असे मयत कीर्तनकार पालकाचे नाव आहे. जगन्नाथ हेंडगे यांनी आपल्या 9 वर्षांच्या तिसरीत शिकणाऱ्या मुलीला झिरोफाटा येथील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत नुकताच प्रवेश घेतला होता. मात्र मुलगी आई-वडिलांना सोडून रहात नसल्याने हेंडगे हे गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचे नातेवाईक मुंजाजी हेंडगे यांच्यासह दुचाकीवरून पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर शिवारातील झिरोफाटा परिसरातील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत मुलीची टी.सी. घेऊन जाण्यासाठी आले होते. दरम्यान, जगन्नाथ हेंडगे हे शाळेच्या आतमधील मुख्य कार्यालयात गेले. ते पंधरा ते वीस मिनिटांनी कार्यालयातून घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरड करीत बाहेर पळत सुटले. सोबत आलेल्या मुंजाजी यांनी विचारल्यावर त्यांनी सांगितले की, मुलीची टी.सी. घेऊन जाण्यासाठी पूर्ण फीची मागणी केली. मुलगीच शिकणार नाही तर फी मी कशासाठी देऊ? असे म्हणताच संस्था चालक प्रभाकर चव्हाण व त्यांचे हिंगोली जिल्हा परिषदेच्या माजी सभापती असलेल्या पत्नीने लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. दरम्यान, त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून पळत आलेल्या दोघांनी उर्वरित रक्कम दे असे म्हणत परत लाथाबुक्क्या घातल्या. नाटक करू नको एक तर पैसे देत नाहीस, असे म्हणून याला येथून घेऊन जा, असे म्हणत परत जगन्नाथच्या गच्चीला धरून मारहाण करीत खाली पाडले. त्यावेळी संस्थाचालक हे त्यांच्या पत्नीसोबत बाहेर येऊन तुम्ही गेले नाही का?, हा हरामखोर मला चावला असे म्हणून येथून निघून जा नाही तर तुमच्यावर केस करतो, असे म्हणून पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून निघून गेले.
घडलेला प्रकार रस्त्यावरील लोकांनी पाहून जखमी जगन्नाथ हेंडगे यांना एका ऑटोमध्ये रुग्णालयात परभणीला पाठवले. परंतु रुग्णालयात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. मयताचे नातेवाईक मुंजाजी रामराव हेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नी यांच्यासह इतरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे हे करीत आहेत.






