डिजिटल अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची सहा कोटींची फसवणूक | पनवेलमधून सायबर चोरटा अटकेत, पाच दिवसांची पोलीस कोठडी
डिजिटल अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची सहा कोटींची फसवणूक पनवेलमधून सायबर चोरटा अटकेत, पाच दिवसांची पोलीस कोठडी

काळा पैसा व्यवहारात डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची सहा कोटी २९ लाखांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्याला पोलिसांनी शनिवारी पनवेल परिसरातून अटक केली. तपासासाठी न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (२८, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड) असे आरोपीचे नाव आहे.आरोपी वाजंत्री याने पुण्यातील एका ज्येष्ठाच्या मोबाइलवर गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला संपर्क साधला होता. त्याने पोलीस असल्याची बतावणीकरून काळा पैसा व्यवहारात (मनी लाँड्रिंग) कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखविले होती. याप्रकरणात डिजिटल अटक करण्यात येणार असून, या नागरिकाला तातडीने पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर ९ ते १९ नोव्हेंबर दरम्यान ज्येष्ठाने वाजंत्रीच्या बँक खात्यात सहा कोटी २९ लाख रुपये जमा केले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठाने शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. दरम्यान, याचस्वरूपाच्या एका गुन्ह्यात केरळ पोलीसही आरोपी वाजंत्री याच्या मागावर होते. सायबर पोलिसांनी केरळ पोलिसांशी संपर्क साधला आहे. वाजंत्रीबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध जारी करण्यात आला आहे.
१ कोटी १० लाख बँकेत ठेवले
गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू असताना आरोपीच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे उघडकीस आले. वाजंत्रीने ९० लाख आणि २० लाख रुपये एका बँकेत मुदत ठेव स्वरूपात ठेवले होते. संबंधित बँक खाते कोकबन येथील श्री. धावीर कन्स्ट्रक्शनचे असल्याचे उघड झाले. त्यानंतर सायबर पोलिसांचे पथकाने वाजंत्री आणि साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे गेले. पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच तो पसार झाला. तो पनवेलमध्ये असल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यानुसार, सापळा लावून वाजंत्रीला ताब्यात घेण्यात आले.






