हनिमूनवर असताना सोनमने केली पतीची हत्या, राजा रघुवंशी हत्या प्रकरण पूर्ण माहिती
मेघालयात झालेल्या बेपत्ता जोडप्याच्या बहुचर्चित प्रकरणाची उकल

मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या मध्यप्रदेशच्या इंदौरमधील दाम्पत्यामधील पतीची हत्या आणि पत्नी बेपत्ता झाल्याच्या बहुचर्चित प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. सोनम रघुवंशी हिनेच सुपारी देऊन पती राजा रघुवंशीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पतीची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या सोनमला रविवारी रात्री उत्तरप्रदेशातील एका ढाब्यावरून अटक करण्यात आली आहे. याशिवाय, सोनमचा कथित प्रियकर तसेच राजाची हत्येची सुपारी घेतलेल्या तीन मारेकऱ्यांच्या देखील मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
मध्यप्रदेशच्या इंदौरचे रहिवासी असलेले राजा रघुवंशी आणि सोनम यांचे 11 मे रोजी लग्न झाले होते. राजा हा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक होता. हे जोडपे 20 मे ला मेघालयात हनिमूनसाठी गेले. 23 तारखेला नोंग्रियाट गावातील एका होमस्टेमधून फिरण्यासाठी बाहेर पडल्यानंतर हे दाम्पत्य बेपत्ता झाले. दुसऱ्या दिवशी त्यांची दुचाकी एका निर्जन ठिकाणी आढळली होती. यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला. 2 जून रोजी नोंग्रियाट गावापासून 20 किमी अंतावरील एक दरीत राजाचा मृतदेह आढळल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले. देशभरात हे प्रकरण गाजले. तपास सीबीआयकडे देण्याची मागणीदेखील करण्यात येत होती. अखेरीस बेपत्ता सोनम पकडली गेली आणि सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.
उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक अमिताभयश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशी वाराणसी-गाझीपूर मार्गावरील काशी ढाब्यावर आढळली. पहाटे ३ वाजता तिला ढाब्यावरून ताब्यात घेण्यात आले. ढाबा मालकाने पोलिसांना याबाबत कळवले. पोलीस येण्यापूर्वी तिने तिच्या माहेरच्या कुटुंबीयांशी ढाबा मालकाच्या फोनवरून संपर्क केला होता. मला वाचवताना पती राजाचा मृत्यू झाल्याचे सोनमने सांगितल्याची माहिती ढाबा मालकाने दिली.दुसरीकडे, मेघालयच्या पोलीस महासंचालक आरा नोंगरांग यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी मेघालय पोलिसांनी उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये विक्की ठाकूर, आनंद आणि आकाश हे कथित मारेकरी तर राज कुशवाह नामक व्यक्तीचा समावेश आहे. राज हा सोनमचा प्रियकर आहे. राज आणिसोनमने तीन गुंडांची मदत घेऊन राजाची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, सोनमच्या वडिलांनी मात्र आपली मुलगी निर्दोष असल्याचा दावा करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मेघालय पोलीस सोनमला निष्कारण बदनाम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर मृत राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात सोनम गुन्हेगार असल्याचे सिद्ध झाले, तिला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा
मेघालय पोलिसांच्या दाव्यानुसार प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड घडले आहे. सोनमचे राज कुशवाह नामक युवकासोबत प्रेमसंबंध होते. राज हा सोनमच्या वडिलांच्या कंपनीत कामाला होता. त्याच कंपनीत सोनम एचआर मॅनेजर होती. सोनमने राजा रघुवंशीसोबत लग्न केले तरी ती राजच्या संपर्कात होती. तिने पती राजाला संपवण्यासाठी प्रियकर राजसोबत कट रचला. यासाठी हनिमूनचे सर्व नियोजन सोनमने केले होते. राजाच्या हत्येसाठी भाडोत्री गुंडांना सुपारी देण्यात आली होती.. हे गुंड राजने पुरवल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी तीन मारेकऱ्यांसह राजला देखील अटक केली आहे. सोनम आणि राज यांच्यातील कॉल रेकॉर्ड तपासण्यात येत आहे.






