भारताच्या ‘या’ शेजारील देशात नाही एकही नदी

पाणी अत्यंत आवश्यक आहे आणि नद्या ऐतिहासिकदृष्ट्या संस्कृतींची जीवनरेखा राहिल्या आहेत. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगात असेही काही देश आहेत जिथे एकही नैसर्गिक नदी नाही. सध्या जगात 20 असे देश आहेत. जिथे एकही स्थायी नैसर्गिक नदी नाही. यात भारताच्या एका शेजारी देशाचा समावेश आहे.
मालदीवमध्ये एकही नदी का नाही ?
हिंद महासागरात वसलेले मालदीव हे एक छोटे बेट राष्ट्र आहे. जे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि सागरी जीवनासाठी प्रसिद्ध आहे. मालदीव खरोखरच अशा देशापैकी एक आहे जिथे कोणतीही नैसर्गिक नदी नाही. मालदीव हे सुमारे 1200 लहान प्रवाळ बेटांनी बनलेले आहे. ज्यापैकी अंदाजे 202 बेटांवरच लोकवस्ती आहे. ही बेटे हिंद महासागरात 871 किलोमीटर लांबीमध्ये पसरलेली आहेत. या बेटांची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून खूपच कमी आहे. जी साधारणतः एक मीटर आहे. याच कारणामुळे हा देश हवामान बदल आणि समुद्राच्या वाढत्या पातळीसाठी अत्यंत संवेदनशील आहे.मालदीव चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. हीच त्याची भौगोलिक स्थिती नद्यांच्या अनुपस्थितीचे मुख्य कारण आहे.
इतक्या लहान आणि कमी उंचीच्या द्वीपसमूहांवर मोठ्या नद्या विकसित होण्यासाठी आवश्यक असा भूभाग आणि उतार उपलब्ध नाही. या देशाला पाण्याच्या अद्वितीय आव्हानांचा सामना करावा लागतो. विशेषतः समुद्राची पातळी वाढत असल्याने त्याच्या गोड्या पाण्याचे स्रोत धोक्यात आले आहेत. मालदीव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पावसाचे पाणी साठवणे, खारे पाणी गोड करणे आणि बाटलीबंद पाण्याची आयात यावर अवलंबून आहे. जलसंधारण आणि शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली त्याच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.





