ट्रम्प यांनी जगातील संघर्ष थांबवला, त्यांना नोबेल मिळावे – व्हाईट हाऊस

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह जगातील अनेक देशांमधील संघर्ष थांबवला आहे. त्यांची ही विशेष कामगिरी पाहता त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी मागणी व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेव्हिट यांनी शुक्रवारी केली आहे.
ट्रम्प यांची पहिल्या सहा महिन्यांतील कारकीर्द यशस्वी ठरली आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या राष्ट्राध्यक्षांचे कौतुक केले.डोनाल्ड ट्रम्प यांनी थायलंड कंबोडिया, इस्रायल-इराण, रवांडा-प्रजासत्ताक कांगो, भारत-पाकिस्तान, सर्बिया-कोसोबो आणि इजिप्त-इथियोपिया यांच्यामधील संघर्ष थांबवला आहे. ट्रम्प यांनी सहा महिन्यांच्या आपल्या कार्यकाळात सरासरी प्रत्येक महिन्याला एक शांतता करार तथा शस्त्रसंधी घडवून आणली. त्यामुळे ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची वेळ आली आहे, असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेव्हिट यांनी म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीची घोषणा ट्रम्प यांनी 10 मे रोजी सर्वप्रथम सोशल माध्यमातून केली होती. त्यानंतर आतापर्यंत जवळपास 30 वेळा त्यांनी भारत-पाक युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चार केला आहे.
व्यापाराची धमकी देत दोन्ही देशांना युद्ध थांबवण्यास आपण भाग पाडल्याचा दावा सातत्याने ट्रम्प यांच्याकडून केला जात आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच संसदेत बोलताना युद्ध थांबवण्यात अन्य कोणत्याही देशाची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले होते. तर, पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी घडवून आणण्यात कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नव्हता. पाकविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्याचा आणि व्यापाराचा काहीही संबंध नव्हता, असे केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी राज्यसभेत ठणकावून सांगितले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’वरील विशेष चर्चेत ते बोलत होते. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यांपासून ते 16 जूनपर्यंत पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नव्हती, असे स्पष्टीकरण जयशंकर यांनी सभागृहात दिले होते.






