मोमोज खायला गेले अन् 15 मिनिटांत 20 लाख लंपास || छ संभाजीनगर मधील घटना

छत्रपती संभाजीनगर येथे बोलेरो कारचा दरवाजा उघडा ठेवून मोमोज खायला उतरणे मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले. अवघ्या 15 मिनिटांत चोरट्याने त्यांच्या कारमधून 20 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केली. 26 जून रोजी सायंकाळी 6 ते 6:15 वाजेच्या सुमारास हडकोतील डी मार्ट मॉलसमोर ही घटना घडली. याप्रकरणी 28 जून रोजी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
वहालबाबू सत्यम कुरपुरोल (27, रा. दुग्गड, ता. नर्सीपट्टनम, जि. अनकापल्ली, ह.मु. सावंगी) हे फिर्यादी आहेत. ते मेघा इंजिनिअरिंग कंपनीत अकाउंटंट आहे. 26 जून रोजी सायंकाळी 5 वाजता तो सावंगी येथील कार्यालतया होता. तेथे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर आनंदराव यांनी हैदराबाद येथील मुख्य कार्यालयात घेऊन जाण्यासाठी 20 लाख रुपये रोकड दिली होती. ही रोकड घेऊन वऱ्हालबाबू, राजारेड्डी, मल्लेश्वरराव आणि चालक किरण चव्हाण हे बोलेरोमधून (MH 20, EE 9888) निघाले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना रेनकोट खरेदी करायचे असल्याने पैठण गेट येथील एका दुकानात गेले. तेथे रेनकोट खरेदी करून ते दिल्ली गेट, हर्सल टी पॉइंटमार्गे जात असताना भूक लागल्यामुळे त्यांनी डी मार्टच्या बाजुला मोमोज खाण्यासाठी कार थांबविली.
10 फुटांवर असताना मारला डल्ला
मोमोज खाण्यासाठी जाताना वहालबाबू यांनी कारचा दरवाजा लॉक केला नव्हता. ते अवघ्या 10 फुटांवरील गाड्यावर मोमोज खात होते. 15 मिनिटांत ते परत कारमध्ये आले तेव्हा पैशांची बॅग त्यांना दिसली नाही. त्यांनी आजुबाजुला विचारपूस केली तेव्हा पांढरा शर्ट व टोपी परिधान करून आलेल्या व्यक्तीने तुमच्या गाडीतून काहीतरी नेले, अशी माहिती एकाने दिली. त्यावरून चोरी झाल्याचे समजले.
दोन दिवसांनी गुन्हा दाखल
कारमधून कंपनीचे 20 लाख रुपये चोरीला गेल्यानंतर निष्काळजीपणा करीत 2 दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पहिल्याच दिवशी फिर्यादी हा पोलीस ठाण्यात का गेला नाही?, असाही सवाल उपस्थित होत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी या तपास करीत आहेत.