रमी ऑनलाइन जुगारमधून जादा पैशाच्या लालसेने घेतला पूर्ण कुटुंबाचा बळी

ऑनलाइन जुगाराच्या चक्रव्यूहात अडकून अनेक तरुण कर्जबाजारी होऊन टोकाचे पाऊल उचलत आहेत. असाच एक खळबळजनक प्रकार धाराशिव तालुक्यातील बावी (का.) येथे सोमवारी उघडकीस आला. रमी ऑनलाइन जुगार व शेअर मार्केटमधून जादा पैशाच्या लालसेने एक तरुण कर्जबाजारी झाला. यातून त्याने पत्नी व अडीचवर्षीय मुलास विष पाजून त्यांचा खून केला. त्यानंतर स्वतः ही विष प्राशन करत गळफास घेऊन आत्महत्या केली.
कर्जबाजारी तरुणाचे नैराश्यातून कृत्य
धाराशिव शहराजवळील बावी येथील घटना
शेतीसह प्लॉट विकूनही कर्ज न फिटल्याने उचलले टोकाचे पाऊल
धाराशिव ते तुळजापूर रोडवरील बावी कावलदार गावातील लक्ष्मण मारुती जाधव (२९) हा तरुण ट्रॅक्टरसह इतर वाहनांवर बदली चालक म्हणून काम करून उदरनिर्वाह चालवत होता. त्याने तीन वर्षांपूर्वी गावातीलच तेजस्विनी (२५) या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. त्यांना शिवांश हा मुलगा झाला. याचदरम्यान लक्ष्मण रमी ऑनलाइन जुगार व शेअर मार्केटच्या आहारी गेला. यामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्याने वडिलोपार्जित एक एकर शेती वर्षभरापूर्वी विकली. त्याने प्रेमविवाह केल्यापासून घरातून दुरावत धारूर रोडवर प्लॉट घेऊन बांधलेले पत्र्याचे घरही १५ दिवसांपूर्वीच गावातील एका जणास विकले. तरीही डोक्यावरील कर्ज फिटत नसल्याने नैराश्यात सापडलेल्या लक्ष्मणने रविवारी (दि.१५) रात्री पत्नी तेजस्विनी व मुलगा शिवांश यांना रोगर हे विषारी औषध पाजून स्वतः औषध प्राशन केले. नंतर पत्र्याच्या आडूस गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना सोमवारी (दि.१६) सकाळी १० वाजता उघडकीस आली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि. शेळके, उपनिरीक्षक बनसोडे, बीट अंमलदार एस. एफ. मोराळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. दरम्यान, तेजस्विनी व शिंवाशवर एका चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर लक्ष्मणवर दुसऱ्या चितेवर अंत्यसंस्कार केले.
घरात सापडल्या ऑनलाइन जुगारातील व्यवहाराच्या वह्या
सकाळी १० वाजले तरी लक्ष्मण जाधव व त्याची पत्नी तेजस्विनी घराबाहेर येत नसल्याने शेजाऱ्यांनी आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. घरातून दुर्गंधी येत असल्याने सरपंच व पोलीस पाटलांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत पत्रा उचकटून तेजस्विनी व शिवांश पलंगावर पडलेले तर लक्ष्मणने गळफास घेतल्याचे दिसले. पोलिसांनी केलेल्या पाहणीत घरात दोन वहह्या सापडल्या. यामध्ये ऑनलाइन रमी जुगारातून आलेली रक्कम आणि गेलेली रक्कम याचा लेखाजोखा मांडलेला होता. दरम्यान, या वह्या पोलिसांनी जप्त केल्या.