शेअर मार्केटच्या आमिषाने पुण्याच्या तरुणाला २६ लाखांचा गंडा
शेअर मार्केटच्या आमिषाने तरुणाला २६ लाखांचा गंडा

पुणे जिल्ह्यात सध्या शेअर मार्केटच्या नावाखाली गंडा घालण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. पुण्यातील बाणेर येथे एका तरुणाला शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून आमिषाखाली 26 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला.
बुल मार्केट इंटरनॅशनल शेअर ट्रेडिंग कंपनीचा एजंट असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरुणाला तब्बल २५ लाख ८९ हजारांचा ऑनलाइन गंडा घातला आहे. ही घटना १ ते २८ एप्रिल २०२५ या कालावधीत बाणेरमध्ये घडली.
याप्रकरणी प्रसाद गणबोटे (४० रा. बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार गणबोटे यांच्याशी १ एप्रिल रोजी सायबर चोरट्यांनी संपर्क केला. बुल मार्केट इंटरनॅशनल शेअर ट्रेडींग कंपनीचा एजंट असल्याची बतावणी केली. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानुसार प्रसादने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.
अवघ्या एक महिन्यात त्यांनी सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या विविध बँक खात्यात तब्बल २५ लाख ८९ हजार रुपये वर्ग केले. मात्र, त्यांना परतावा न मिळाल्यामुळे प्रसादने संबंधिताला विचारणा केली. त्यानंतर सायबर चोरांनी त्यांच्याशी संपर्क तोडून फसवणूक केली.





